सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या ७४ व्या वर्षात पदार्पण केले असून, ट्विटरवर त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनय, शैली आणि करिष्माने त्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध व्यक्तींनीही खास संदेश दिले आहेत.
रजनीकांतच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव | आज सुपरस्टार रजनीकांत वयाच्या ७४ व्या वर्षात
दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांनी रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना प्रेरणास्त्रोत म्हणून संबोधले. त्यांच्या संदेशात लिहिले होते, “हॅप्पी बर्थडे सुपरस्टार थलायवा! @rajinikanth सर, तुम्ही आम्हा सर्वांसाठी एक प्रेरणा आहात.” अभिनेता थलापती विजय यांनी त्यांच्या पक्षाच्या एक्स अकाऊंटवरून शुभेच्छा देत, “आदरणीय सुपरस्टार रजनीकांत सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो,” असा संदेश दिला.
दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराज यांनीही आपल्या शब्दांत भावना व्यक्त केल्या, “हॅप्पी बर्थडे थलायवा!” असे त्यांनी ट्विट केले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी रजनीकांत यांना “माझा प्रिय मित्र” असे संबोधून खास संदेश दिला. “तुमच्या अभिनयाने आणि शैलीने सहा ते साठ वयोगटातील सर्वांना चाहती बनवले आहे. तुमच्या यशाचा प्रवास असाच चालू राहो, शांती, आनंद आणि लोकप्रियता लाभो,” असे त्यांनी नमूद केले. अभिनेता एस. जे. सूर्या यांनी रजनीकांत यांना शुभेच्छा देताना लिहिले, “सुपरस्टार रजनीकांत सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचा प्रत्येक वर्ष आनंदमय जावो. मी तुमचा नेहमीचा चाहता आहे!” महानायक कमल हासन यांनी रजनीकांत यांना “प्रिय मित्र” म्हणत त्यांच्या दीर्घायुष्य व आनंदासाठी शुभेच्छा दिल्या. “तुमचा यशाचा प्रवास अधिकाधिक गगनाला भिडो. तुम्हाला आरोग्य व समाधान मिळो,” असे त्यांनी लिहिले.
रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रेमळ प्रतिसाद पाहता, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत किती खोल प्रभाव टाकला आहे हे स्पष्ट होते. अभिनय, शैली व मानवी मूल्यांच्या आधारे त्यांनी जगभरात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या पुढील प्रवासासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा!