नाते तुझे माझे

हे खुले पत्र एवढ्या साठी की नणंद आणि भावजयच्या नात्याची थोडी उजळणी करायचीय

Pratiksha Dapurkar
Initially published on:

प्रिय रेणू,
सर्वप्रथम तू आमच्या घरच्या स्थळाचा लग्नासाठी स्विकार केलास यासाठी तुला खूप खूप धन्यवाद. तू यावं असं आम्हालाही वाटत होतं आणि आम्ही आमच्या परिने तुझे स्वागत आणि स्विकार करण्याचा प्रयत्न करतोय. तुला खूप प्रेम.
हे नवीन घर तुला ‘सासर’ न वाटता तुझं ‘स्वतःचं’ घर वाटावं म्हणून आम्ही तीन बहिणी, आईबाबा आणि प्रतिक जमेल ते करण्याचा प्रयत्न करतोय. तू येण्या आधी एक महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे ‘विवाहपूर्व समुपदेशन’ पूर्ण कुटुंबाचं… आपल्या सगळ्यांच्या जुळून येणाऱ्या नात्यासाठी. आपण एकमेकांना समजून घ्यावं यासाठी.
मी एक स्त्री, विवाहिता आणि नात्यासंदर्भातील चिंतक म्हणून काही गोष्टी तुझ्याशी बोलाव्या वाटतात. या महत्वाच्या आहे का? तर नक्कीच आहे.

तू माझ्या भावाशी लग्न केल्यामुळे मी तुझी ‘नणंद’ झाले. आणि नणंद या भूमिकेतून मला स्वतःला पडताळून बघायची संधी मिळाली. बऱ्याच कथाचित्रपटांमध्ये आणि गेल्या पिढीच्या स्त्रियांच्या अनुभवातून, माझ्याही पिढीत सासूचा जसा धाक तशी नंदेची धास्ती बघितली. तू भावजय म्हणून माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष आल्यानंतर मी ‘नणंद’ च्या भूमिकेत कशी वागते, मला काही विशेष वाटतं का ते बघायचं होतं. कारण नंदेचा तोरा हा विशेष म्हणे. त्यात नणंद वयाने मोठी म्हटल्यावर तर विचारायलाच नको. म्हणून नेमके ‘आदरातिर्थपणाचे’ किती शिंग येतात हे बघायचं होतं.

तुझ्यात आणि माझ्यात दहा वर्षाच अंतर!! आता दशकादशकाने पिढी बदलते. त्यातल्या त्यात माझ्या पेक्षा लहान असलेल्या भावाची तू बायको… त्यामुळे मी अजुनच मोठं आणि विशेष वाटून घ्यायला हवं नाही का? पण खरं सांगू मला तसं काहीही वाटलं नाही. त्यामुळे हा सगळा मानसिक अहंपणाचा खेळ आहे असं मला वाटतं.

नाते तुझे माझे
नाते तुझे माझे

तुला एक सांगू, मुलगी लग्न करून येते तेव्हा ती फक्त तिचं माहेर सोडून येते. मात्र तिचे विचार, शिक्षण, स्वभाव, राहणीमान तिच्या सोबतच असतात हे खरंतर कोणीही विसरता कामा नये. रेणू, तुझं स्वतंत्र अस्तित्व आहे. तुझं अस्तित्व, मत आणि तुझा सल्ला नेहमीच महत्वाचा असेल. इतर नणंद प्रमाणे वर्ल्ड फेमस डायलॉग ‘हिला सल्ला द्यायला आणलं का?’ ‘आता हीचं ऐकायचं का? ही तर जास्त शिकलेली.. वरचढ होईल…डोक्यावर नाचेल!’ असं कधीही म्हणणार नाही… आणि मी स्वतः माझा भाऊ लहान असला तरी ‘तुझ्या बायकोला कंट्रोल कर’ असा फालतू आणि गर्विष्ठ सल्ला त्याला मुळीच देणार नाही. मी जरी त्या घरची मुलगी असली तरी वहिनी म्हणून तुझी जागा त्या घरात विशेष आहे. हे प्रत्येक नंदेने लक्षात ठेवलं पाहिजे. तुझ्या हाती फक्त स्वयंपाक घर नव्हे तर आमची सगळी प्रेमाची माणसं आणि त्याचं भविष्य आहे.

नणंद हा घरातल्या नात्यातला दुवा असतो. भावाचा संसार प्रेमाने व्हावा की भांडणाने ही ठरवण्याची ताकद नंदेत आहे. नंदेचं माहेर जपावं ते भावजयने आणि भावाचा संसार जपावा तो नंदेने. रक्ताच्या नात्यात कितीही भांडण झाले तरी ते विरघळून जातात. मात्र कायद्याने बनलेल्या नात्यात गाठी पडतात. कधीही न विरघळण्यासाठी. लहान भावाच्या बायकोला नंदेने प्रेमपूर्वक आणि मोठ्या भावाची बायको म्हणजे वहिनी असेल तर फार प्रेमाने आदरपूर्वक वागणूक द्यायला हवी.

घरात सून यावी असं प्रत्येकाला वाटतं. उत्साह, उत्स्तुकता असते. तिने घरात सगळं जुळवून घ्यावं, आहे तसं सांभाळून घ्यावं अशी साधारण समाजमान्य अपेक्षा असते. ती तसा प्रयत्न ही करते. पण ‘ती आहे तशी’ त्या मुलीचा स्विकार करणे, तिला जुळवून, सामावून घेणे यासाठी सासरी वेळ दिला जातो का? स्वतःला आणि तिलाही? एक समाजचिंतक म्हणून मला ही बाब महत्वाची वाटते. साध्या तीन सिटर सोफ्यावरही आपण चौथा सांभाळून बसवतो. तसचं घरात आलेल्या सूनेलाही तिची हक्काची जागा देणे अत्यावश्यक आहे. ती मुळातच कोणाची जागा घ्यायला आलेली नसते.

घरी आणल्यावरही तिला सुरुवातीलाच जर सामावून घेतले नाही, समजून घ्यायचा, बोलायचा वेळ दिला नाही.. घरचे तिच्याशी अलिप्त राहिले.. बोललेच नाही.. आमचं वातावरण असं तसं.. असच करत राहिले तर मग नात्याची घडी नीट बसेल का? ते घर तिला तिचं वाटेल का? रेणू, हे होऊ नये याकडे आम्ही आवर्जून लक्ष दिलं, देतोय आणि देणार. आणि तूही खूप उत्तम प्रतिसाद देत आहेस.

टॉपर मुली कुठे जातात असं विचारतात! विचारणाऱ्यांना हे माहीत असतं का की मुलगी जेव्हा लग्न होऊन येते तेव्हा तिला घरातल्या कामासकट घरातली नातीही सांभाळायची असतात. लग्न करून आल्या बरोबर ती सकाळी उठून आंघोळ करून स्वयंपाकघर कधी-कशी सांभाळायला घेते इथपासून तर दिवसभर काय करते, कशी बोलते, कशी वागते, स्वच्छ राहते का, झोपते किती वाजता इथपर्यंत तिच्या मागे बोलके सीसीटीवी असतात. इतकेच नव्हे तर सगळ्यांचे रुसवे, फुगवे काढत बसावे लागतात. कधी कधी हे तिच्या पुरतेच नाही तर तिच्या माहेरच्यांना पण रुसवे काढण्यात वेळ घालवावा लागतो. तिला फक्त घरात नव्हे तर प्रत्येकाच्या मनात देखील जागा देणे गरजेचे आहे. यादरम्यान जर तिला कोणी आपलेपणाची, प्रेमपूर्वक वागणूक दिली नाही, तिच्याशी संवाद साधला नाही तर तिला एकटेपणा येऊ शकतो. मग शेवटी ती घरातला तिचा आवाज हरवून बसते.

आपल्या बायांची अर्धी अधिक ऊर्जा ही नाते संबंध जपण्यात, बाळंत पासून ते सरणापर्यंत करण्यात चालली जाते. काय त्या वाचणार, लिहिणार आणि काय त्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग देणार!! लग्न करायला कोणी शिक्षण सोडतं, घर सांभाळायला कोणी नोकरी सोडतं, कोणी प्रमोशन मागे टाकतं, कोणी उराशी कटाळलेलं स्वप्न, स्वप्नातला शहर सोडतं… प्रत्येक स्त्रीची व्यथा वेगळी.

घराच्या चौकटीत तिचे मुक्त असणे, बोलणे, हसणे, तिचं मत विचारात घेणे, तिचा आदर करणे हे संविधानाच्या चौकटीत प्रथम आहे.

एका मित्राने मला विचारलं होतं की, “संसारात सुख आणि आनंद यात काय फरक आहे?” तर तो असा की “संसारात जर नातेसंबंध चांगले असेल तर सुख असतं; नसेल तर आनंद मानून पुढे जायचं असतं.”
लग्न हा स्त्री च्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा. मी नेहमी म्हणते की एकाच आयुष्यात मुलीचा तीन वेळा जन्म होतो. पहिला जेव्हा ती आईच्या पोटातून बाहेर येते. तिसरा जेव्हा ती आई होते अर्थात तिला बाळ होतं आणि दुसरा जेव्हा तिचं स्वतःचं लग्न होतं तेव्हा… हा लग्न झाल्यानंतरचा जन्म तिला कुठचा कुठे घेऊन जाऊ शकतो. हा जन्म जर चुकला, चुकीच्या ठिकाणी दिल्या गेल्या तर ती होत्याची नव्हती देखील होऊ शकते. लग्नानंतर (हुंडा, पतीचे व्यसन, सासरचा जाच, हिंसाचार, घटस्फोट) विविध कारणांनी किती तरी मुली उध्वस्त झाल्याच्या आपण बघितल्या आहे. कितीतरी मुली मानसिक रुग्ण झाल्या.

यातला तुझा हा दुसरा जन्म झाला. हा जन्म तुला खूप सुखमय आणि आनंददायी होवो. लग्नानंतरच्या या जन्माबरोबर लगेच तुझा खरा जन्मदिन आला. तुला खूप खूप सदिच्छा आणि भरभरून प्रेम?अशीच प्रेम तू आपल्या कुटुंबाला देत रहा. तुझा नवरा तर असेलच पण नणंद म्हणून आम्ही बहिणी विश्वासाने, आपुलकीने तुझ्या सोबत आहोत. तू बिनधास्त रहा. हवं ते माझ्या कडून घे. आपण आपले विचार, सामान, वस्तू सगळ्या अदलाबदल करून वापरत जाऊ आणि प्रेम वाढवत राहू. ‘नणंद आणि भावजय’ या नात्याला मैत्रिणीचे छान रूप देऊ. पत्र खूप लांबलं याची कल्पना आहे मला. थांबते.

by Pratiksha Dapurkar

वाचकांना हे पण आवडले